मुंबई / कोल्हापूर : जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनी काल रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. कोरे यांनी भाजपकडे विधानसभा निवडणुकांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई या ठिकाणी एकूण ९ जागांची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजप आणि जनसुराज्य पक्ष यांनी हातमिळवणी केली आहे. एकीकडे शिवसेना-भाजपचा जागा वाटपाचा तिढा सुटत नसताना, मित्रपक्षाला कोणत्या जागा द्यायच्या हे नक्की होत नसतांना आता जनसुराज्य पक्षाच्या मागणीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांना तिकीट मिळणार की नाही, याचीही चर्चा सुरु आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरतील. त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जाते आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे नेते अजूनही युती होणारच असा दावा करत आहेत. दरम्यान, भाजपकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष पुढे आला होता. तर महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपावरून संदिग्धता आहे. त्यातच आता युतीच्या घटकपक्षांमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भाजपा-शिवसेना युतीमध्ये घटक पक्षांना १८ जागा सोडण्यात येणार आहेत. यात महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, विनायक मेटे यांचा शिवसंग्रामचा समावेश आहे. असे असताना विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षानेही जागांची मागणी केली आहे. त्याआधी ४ घटक पक्षांना सोडलेल्या १८ जागांपैकी १२ जागा आपल्या पक्षाला मिळणार असल्याचा दावा महादेव जानकर यांनी केला आहे. त्यामुळे घटक पक्षांचे काय करायचे, हे भाजपपुढे आव्हान असणार आहे.
जानकरांचा दावा खरा मानला तर उरलेल्या ६ जागा इतर ३ पक्षांसाठी उरतात. त्यामुळे जानकारांच्या या दाव्यावरून घटक पक्षात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रामदास आठवले यांनी याआधीच त्यांच्या पक्षाला १० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आता विनय कोरे यांनी कोल्हापूर , सांगली आणि मुंबईतील एकूण ९ जागांवर मागणी केली आहे. त्यामुळे भाजप घटक पक्षाला कसा न्याय देणार आणि शिवसेनेला किती जागा सोडणार याचा मोठा गुंता आहे. तसेच अन्य पक्षातून भाजपमध्ये दाखल होणारे यांचा विचार करता, जागा वाढपाचा तिढा न सुटण्यातला आहे, अशी चर्चा रंगत आहे.