मुंबई : पवार कुटुंबातील तिसरी पिढी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. रोहित पवार यांच्यापुढे भाजपच्या राम शिंदे यांचं आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरताना रोहित पवार यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.
रोहित पवार यांची एकूण संपत्ती २७ कोटी ४४ लाख २९ हजार २०० रुपये एवढी आहे. तर त्यांची स्थावर चल अचल मालमत्ता २३ कोटी ९९ लाख २९ हजार २०० रुपये एवढी आहे. रोहित पवार यांच्याकडे वडिलोपार्जित ३ कोटी ४५ लाख रुपयांची संपत्ती आहे.
रोहित पवार यांच्या बँक खात्यात २,७५,३१,०३४ रुपये आहेत. तर त्यांनी बॉन्ड, डिबेनचर्स आणि शेयर्समध्ये ९,६५,११,०७१ रुपयांची गुंतवणूक केली आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट आणि विम्यामध्ये रोहित पवार यांचे ५७,०७,०२९ रुपये आहेत.
रोहित पवार यांच्याकडे ११,९२,३१९ रुपयांची गाडी आहे. तर ११,२१,७३२ रुपयांचं सोनं, ४७,००७ रुपयांची चांदी, १,६८,००० हजार रुपयांचे हिरे आणि ४,५२,४२० रुपयांचे इतर दागिने आहेत.
रोहित पवार यांच्याकडे रोलेक्स, ओमेगा, टॅग ह्युअर, कार्टर, लॉगीनेस या कंपन्यांची घड्याळं आहेत. या घड्याळांची अंदाजे किंमत २८,९१,९२८ रुपये असल्याचं रोहित पवार यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.