पुणे : शरद पवार साहेब कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असले तरी ते कुस्ती खेळू शकत नाहीत, त्यामुळे आम्ही भाजपासोबत असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय. शरद पवार तगडे पैलवान होते, पण सध्या पवारांपेक्षा देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवलेच खरे पैलवान आहेत, असं विधान त्यांनी खास आठवले शैलीत केलंय.
दुसरीकडे शिवसेनेनं १० रुपयांमध्ये थाळी देण्याचं आश्वासन दिलंय... पण भाजपा ५ रुपयांमध्ये तर आम्ही ८ रुपयांत थाळी देण्याचा विचार करत होतो. मात्र, 'आता दोघांची थाळी खाऊन ठरवू... खाऊ त्यांची थाळी, देऊ त्यांना टाळी' अशा शब्दांत शिवसेना-भाजपाला कोपरखळी मारलीय. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते. जेव्हा बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून अमोल कोल्हे निवडून आले तिथे ईव्हीएम मशीन नव्हत्या का? त्यामुळे ईव्हीएम मशिनवर शंका घेण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलंय. ईव्हीएम नाहीतर आम्हाला माणसांच्या मनाची साथ असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.