जळगाव : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या दोन व्हिडिओवर जळगावच्या सभेत मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी टीका केली. अकोला जिल्ह्यात बाळापूरच्या सभेत हार घातला जात असताना एक नेता मध्येच घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याला कोपरानं ढकलून पवारांनी बाजुला केलं... या कृतीवर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ताशेरे ओढले.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा शरद पवारांचा हाच तो व्हिडिओ ज्यावर पंतप्रधान मोदींनीही जळगावात टीका केली#SharadPawar pic.twitter.com/wx0rQMIN9x
— ZEE २४ तास (@zee24taasnews) October 13, 2019
तर शनिवारी बार्शीमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पवारांनी विचित्र हातवारे केले होते. याचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला असे नटरंगसारखे हातवारे करता येत नाहीत, असं म्हटलंय. आमच्यासमोर कुस्ती लढायला कोणीच नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केला होता. त्याला उत्तर देताना 'कुस्ती पेहलवानांशी होते, अशांशी (हातवारे करत) नाही' असे म्हणत शरद पवार यांनी आक्षेपार्ह हातवारे केले होते.
जळगावच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडवणवीस यांची तोंडभरून स्तुती केली. फडणवीसांनी महाराष्ट्रात ५ वर्षं स्थीर सरकार दिलं. आता पुन्हा जनतेनं त्यांना बहुमतानं निवडून द्यावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. तीन तलाकविरोधी कायदा आणि अनुच्छेद ३७० हटवल्याचे मुद्देही त्यांच्या भाषणात आले. तीनतलाक विरोधात कायदा केल्यामुळे मुस्लीम पती कदाचित संतप्त झाले असतील, पण आपल्या मुलीचं भवितव्य सुरक्षित झाल्याचं पाहून मुस्लीम पिता मात्र या कायद्यानं सुखावल्याचा दावा मोदींनी केला. हिंमत असेल तर अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याचा उल्लेख घोषणापत्रात करा असं आव्हान त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलं.