भाजपा प्रवेश रखडल्याने कार्यकर्ते नाराज, राणे साधणार संवाद

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे.

Updated: Sep 24, 2019, 08:55 AM IST
भाजपा प्रवेश रखडल्याने कार्यकर्ते नाराज, राणे साधणार संवाद  title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश रखडल्याने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करुन त्यांच्यात विश्वास भरण्याचा राणे यांचा प्रयत्न असेल.मालवणमध्ये अनेक राणे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान राणेंनी आज कार्यकर्त्यांना मुंबईत बोलावले आहे. 

मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे असं राणेंनी म्हटलं होतं. तर राणेंचा योग्य वेळी निर्णय होईल असं मुख्यमंत्री सांगत होते. भाजपसाठी राणे अवघड जागेचं दुखणं झाले आहेत का?. राणेंच्या भाजप पक्षप्रवेशात आड येणारा ग्रह म्हणजे शिवसेना आणि युतीत अडून बसलेला ग्रह म्हणजे नारायण राणे, या दोन्ही ग्रहांची एकमेकांवर वक्रदृष्टी असल्यानं भाजपच्या दारात उभ्या असलेल्या राणेंना उंबरठा काही ओलांडता येत नाही आहे.

माझ्यामुळे युती आणखी भक्कम होईल. युती झाली की मी भाजपमध्ये प्रवेश करेन. मुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील, असे राणे यांनी म्हटले. तसेच माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभ आहे. मी केवळ योग्य वेळेची वाट पाहत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्या विरोधाला जुमानतील असे वाटत नाही. मात्र, माझा शिवसेनेला कोणताही विरोध नाही. कारण, युती झाली किंवा न झाली तरी  माझा भाजपप्रवेश निश्चित असल्याचे राणे यांनी सांगितले. 

भाजप राणेंना आपलं म्हणायला वारंवार हुलकावणी देतं आहे. राणेंनी घर बदललं की त्यांना स्थैर्य नाही, हे काळानं सिद्ध केलं आहे. घर फिरलं की वासेही फिरतात, याचा राजकारणातला अनुभव सध्या राणे घेत आहेत. राणेंबरोबर नितेश आणि निलेश या दोघांचंही राजकीय भवितव्य पणाला लागलं आहे. राणेंबरोबर ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली, त्या सगळ्यांनी इतर पक्षांमध्ये हात पाय पसरले. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मात्र आज एकाकी झाले आहेत.