अमर काणे, झी मीडिया, नागपूर : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी उपराजधानी नागपूरमध्ये धामधूम सुरू झाली आहे. नागपुरात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे? उमेदवारीसाठी कोणते चेहरे शर्यतीत आहेत? याचा एक आढावा.
नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होमपीच. अर्थातच भाजपचा बालेकिल्ला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरमधील सर्वच्या सर्व सहा जागा जिंकून भाजपनं विजयाचा षटकार ठोकला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी तब्बल २ लाखांच्या मताधिक्यानं विजयी झाले. या निवडणुकीत उत्तर नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना मिळालेली आघाडी भाजपाला चिंतेत टाकणारी आहे. मात्र यंदाच्या विधानसभेलाही शत प्रतिशत यश मिळेल, असा दावा भाजपकडून केला जातोय.
गेल्या पाच वर्षात नागपुरात अनेक विकास कामं झाली. मात्र बेरोजगारी, महापालिकेचा भोंगळ कारभार यामुळं जनतेचा भाजपावर रोष असल्याचं काँग्रेसकडून सांगितलं जातं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिण पश्चिम नागपूरमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध काँग्रेसला अजूनही प्रबळ उमेदवार सापडलेला नाही. पूर्व नागपुरातून आमदार कृष्णा खोपडे यांना भाजपाकडून उमेदवारी निश्चित आहे. मध्य नागपुरातून भाजपकडून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके देखील इच्छूक आहेत. तर काँग्रेसकडून माजी आमदार अनिस अहमद यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत.
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा करत असली तरी भाजपकडून विद्यमान आमदार सुधाकर कोहळे, मोहन मते, छोटू भोयर तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडून प्रमोद मानमोडे, विशाल मुत्तेमवार यांच्यासह निलंबनानंतर काँग्रेसमध्ये परतलेले सतीश चतुर्वेदीही रेसमध्ये आहेत. पश्चिम नागपूरमधून भाजपा पुन्हा सुधाकर देशमुख यांना उमेदवारी देणार की नवीन चेहरा रिंगणात उतरवणार, याबाबत उत्सूकता आहे.
काँग्रेसमधून शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे. सगळ्यात काट्याची टक्कर रंगणार ती उत्तर नागपुरात. लोकसभेला काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्यामुळं इच्छुकांची संख्याही वाढली आहे. माजी मंत्री नितीन राऊत, किशोर गजभिये आणि संदीप सहारे काँग्रेस उमेदवारीसाठी सज्ज आहेत. तर भाजपा यंदा आमदार मिलिंद मानेंऐवजी नवीन चेहरा मैदानात उतरवण्याची चर्चा आहे. उत्तर नागपुरात बसपा आणि वंचितची चांगली व्होट बँक आहे. त्यामुळं हे दोन पक्ष कुणाला उमेदवारी देतात, याकडंही सर्वांचंच लक्ष असेल.
नागपुर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात वंचित आणि बसपा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे. मात्र उपराजधानीतलं भाजपाचं वर्चस्व पाहता पुन्हा एकदा भाजप नागपुरात विजयी षटकार लगावणार का? आणि काँग्रेसला एखादी जागा तरी जिंकता येईल का? याची उत्सूकता आहे.