जागावाटपाआधीच 'या' मतदारसंघावर शिवसेनेचा दावा

युतीचं अद्याप काही ठरलं नसताना मतदारसंघांमध्येही दोन्ही पक्षांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत.

Updated: Sep 13, 2019, 06:50 PM IST
जागावाटपाआधीच 'या' मतदारसंघावर शिवसेनेचा दावा  title=

पुणे : युतीचं अद्याप काही ठरलं नसताना मतदारसंघांमध्येही दोन्ही पक्षांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत. पुणे जिल्ह्यातल्या भोसरी मतदारसंघावर शिवसेनेनं दावा ठोकल्यानं वादाची पहिली ठिणगी पडली आहे. शिवसेना-भाजपा युती झालीच, तर विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षाकडेच राहतील, असा सर्वसाधारण फॉर्म्युला ठरू शकतो. मात्र भोसरीमध्ये शिवसेनेला हे मान्य नाही. इथून २०१४मध्ये महेश लांडगे निवडून आले असताना शिवसेनेनं या जागेवर दावा सांगितलाय. माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव अढळराव पाटील यांनी भाजपावर टीका करत या जागेची मागणी केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत चिंचवडची जागा भाजपकडे, पिंपरीची शिवसेनेकडे आणि भोसरीची भाजपाकडे असायला हवी. मात्र आढळरावांनी या जागेवर दावा करत अप्रत्यक्षपणे लांडगेंना अडचणीत आणलंय. अर्थात लांडगे हे मुळचे भाजपा नेते नाहीत.

२०१४मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आलेत. त्यावेळी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, तर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. आता लांडगे भाजपासोबत असले तरी तांत्रिकदृष्ट्या ते अपक्षच आहेत. आढळरावांच्या मागणीला हा आधार आहे. अर्थातच, लांडगे समर्थकांना हे मान्य नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या आढळरावांना भोसरीमध्ये लांडगेंमुळेच ३८ हजारांचं मताधिक्य होतं, याची आठवण कार्यकर्त्यांनी करून दिलीये. 

भोसरीसाठी शिवसेना अचानक आक्रमक का झाली आहे. हे अद्याप स्पष्ट नसलं तरी या निमित्तांना लांडगेंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो.