पुणे : भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्री कोण होणार ? यावरून खलबत सुरु आहेत. दोन्ही पक्षांनी राज्यात आपल्या महाजनाधार यात्रा सुरु केल्या आहेत. आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची चर्चाही सुरु झाली आहे. या सर्वाच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युतीमध्ये आरपीआयसुद्धा आहे आणि आमची १० जागांची मागणी आहे अशी आठवण आठवलेंनी करुन दिली आहे. ते पिंपरी मध्ये बोलत होते.
आम्हाला मिळणाऱ्या दहा जागांपैकी पुण्यातील कॅन्टोन्मेंट आणि पिंपरी या दोन जागांचा समावेश असल्याचा पुनरोच्चार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. शरद पवार यांनी सर्वच घटकांसाठी मोठे काम केले आहे पण देशभरात मोदींची हवा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्या पक्षात विजयाची खात्री नसल्यामुळे ते पक्ष सोडत असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.