Ashadhi wari 2023: आळंदी मंदिरात विठूनामाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. पालखी मुख्य मंदिरातून परिसरात दाखल झालीय. यावेळी माऊलींच्या मानाच्या आश्वावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सारे वारकरी विठूनामाच्या गजरात तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आज आळंदी इथल्या गांधी वाड्यात असणार आहे. मात्र, आळंदी (Alandi News) येथे वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार (Police baton charge) झाल्याची घटना समोर आली आहे.
आळंदीत वारकरी आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची माहिती मिळाली आहे. वारकऱ्यांची गर्दी झाल्यानं पोलिसांना वारकऱ्यांना आवरणं कठीण झालं. पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. आळंदीच्या मंदिराबाहेर हा प्रकार घडला आहे. पालखी सोहळ्यावेळी मानाच्या वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र इथं वारकऱ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस आणि वारकरी आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र पुणे पोलिसांनी परिस्थिती संयमाने नियंत्रणात घेतल्याने कोणताही मोठा प्रकार घडला नाही.
श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी बांधव यांच्याबद्दल सरकारची काही… pic.twitter.com/IDtIy1azn3
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) June 11, 2023
बॅरिकेड तोडून काही वारकऱ्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असं पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं आहे.
मंदिर परिसरातील वाद मिटला मात्र ज्ञानेश्वर मंदिरासमोर आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, घडलेल्या या प्रकरणामुळे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी बांधव यांच्याबद्दल सरकारची काही जबाबदारी आहे की नाही?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आळंदीत (Pune News) मोठ्या संख्येने वारकरी दाखल झालेत. स्नान करून हे वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे इंद्रायणीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफची टीम ही तैनात करण्यात आली आहे.