तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : राज्यभरात आज आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) उत्साह पाहायला मिळत आहे. वैष्णवांच्या मांदियाळीने पंढरपूर फुलून गेले आहे. लाखो वारकरी भगवान विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाले आहे. या भाविकांसाठी पंढरपुरात शासनाकडून योग्य अशा सोई सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र विठुराच्या दर्शनासाठी निघालेल्या साताऱ्यातील भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका भाविकाचा मृत्यू (Satara Accident) झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.
साताऱ्याच्या माण तालुक्यातील लोधवडेजवळ पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बोलेरो गाडी अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडी पूर्णपणे चेपली आहे. या भीषण अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले आहे. तर कल्याण भोसले नावाच्या भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावचे असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात हलवले आहे.
आषाढी एकादशी निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील कल्याण भोसले हे बोलेरो गाडी क्रमांक एमएच 11 बीएच 0896 घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. कल्याण भोसले यांच्यासोबत इतर सहा जण याच गाडीतून प्रवास करत होते. साताऱ्याच्या गोंदवले खुर्दनजीक लोधवडे फाट्यानजीक भोसले यांची गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हर टेक करताना अचानक चारवेळा पलटली आणि एका शेतात जाऊन उलटली. या अपघातात कल्याण भोसले यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य सहा भाविक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर लोधवडे, संभाजीनगर येथील रहिवाशांनी घटनास्थळी येऊन जखमींना गाडीतून बाहेर काढले.
मुंबई -गोवा महामार्गावर एसटी बसचा अपघात
मुंबई गोवा महामार्गावर एसटी बस आणि खाजगी कंपनीच्या बसमध्ये भीषण अपघात घडलाय. नवी मुंबईतील पळस्पे पुलावर हा अपघात झाला आहे. अपघातात पेण - पनवेल ही एसटी बस खाजगी कंपनीच्या बसला धडकली आहे. या अपघातात एसटी बसचा आणि खाजगी बसचा ड्रायव्हर जखमी झाले असून प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. एसटी बस पेणवरून पनवेलला येत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. एसटी चालकाचा ताबा सुटल्याने बस पेणकडे जाणाऱ्या मार्गावर बस येऊन दुसऱ्या बसला धडकली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.