'स्वप्नीलची आत्महत्या नाही तर सरकारने केलेली हत्या'! राज्यातील विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांनी थेट सरकारला विचारला जाब

Updated: Jul 4, 2021, 06:41 PM IST
'स्वप्नीलची आत्महत्या नाही तर सरकारने केलेली हत्या'! राज्यातील विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  पुण्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या 24 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्वप्नील मुख्य परीक्षेत (MPSC Main Exam) 2 वेळा उत्तीर्ण झाला. मात्र त्यानंतरही नोकरी नसल्याच्या तणावातून आणि घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याने आत्महत्या (Suicide) करत जीवन संपवलं. 

स्वप्नीलच्या आत्महत्येचे राज्यभर पडसाद

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुलं थेट सरकारला जाब विचारू लागली आहेत. स्वप्नीलच्या आत्महत्येचे नाशिकमध्ये पडसाद उमटलेत. हुतात्मा स्मारकात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारचा निषेध करत निदर्शनं केली. कोरोनाकाळात मॉल उघडायला परवानगी असताना परीक्षा घेण्यात काय अडचण आहे, असा सवाल विद्यार्थ्यांनी केलाय. लवकरात लवकर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आलीये. 

 'नियुक्त्या न होणं लाजिरवाणी बाब'

राज्यभरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असतात. अपुरे पैसे आणि कठिण परिस्थितीत ही मुलं परीक्षेची तयारी करत असतात. कोरोनामुळे गेली दीड वर्ष या मुलांसमोर अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. पण या सर्व परिस्थितीवर मात करुन मुलं स्पर्धा परीक्षा पास करतात. त्यानंतरही शासन नियुक्ती आदेश देत नसेल, तर मात्र ही लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली.  

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना याचा मोठा बसतो आहे. नोकऱ्या नसल्याने एमपीएसीचे काही विद्यार्थी शेतीची काम करत आहेत, तर काही जणं मिळेल ती कामं करत आहेत. परीक्षा पास होऊनही सरकार त्यांना नियुक्त्या देत नसेल तर सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न पडला आहे. पुण्यात आमच्या मित्राने केलेली आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्याच आहे, असा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे.  

'बस, मॉलमधली गर्दी चालते मग...'

शासन आणि राजकीय नेत्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे स्वप्निलने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप आणखी एका विद्यार्थ्याने केला आहे. बसमध्ये, मॉलमध्ये इतकी गर्दी असते, बस पूर्ण क्षमतेने धावत असते, मग परीक्षा घ्यायला अडचण का? हे सरकारने चालवलेलं षडयंत्र आहे, असा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.