खोपोली येथील कंपनीत स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

रायगड जिल्ह्यातील खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्यात  सोमवारी मध्यरात्री रात्री झालेल्या  स्फोटामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू .

Updated: Jul 14, 2020, 10:36 AM IST
खोपोली येथील कंपनीत स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी title=

प्रफुल्ल पवार / अलिबाग : रायगड जिल्ह्यातील खोपोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंडिया स्टील कारखान्यात सोमवारी मध्यरात्री रात्री झालेल्या  स्फोटामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयाद दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोट भयंकर होता. दोघांच्या शरीराचे तुकडे झालेत. यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येईल. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजले नाही. परंतु गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दिनेश वामनराव चव्हान (५५, खोपोली), प्रमोद दूधनाथ शर्मा (३०,खोपोली) या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर सुभाष धोंडीबा वांजळे (५५, खोपोली) हे गंभीररित्या  जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोट इतका भीषण होता की मृत पडलेल्या दोघांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे उडाले तर स्फोटाच्या आवाजाने परिसरात हादरे बसले. भंगार मधील लोखंड वितळवण्याचे काम या कंपनीत होत आहे. या कामासाठी वापरण्यात येणार्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

याच कंपनीत यापूर्वीही दोन वेळा अशाच घटना घडल्या असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमीवर नवी मुंबई येथील एका रूग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे . दरम्यान हा स्फोट इतका भीषण होता की मृत कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले असून हे छिन्न विच्छिन्न तुकडे पिशवीत भरुन आणावे लागले.