Amravati: शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्रावर तुफान राडा

आमदार देवेंद्र भुयार यांना धक्काबुक्की, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

Updated: Sep 11, 2022, 02:19 PM IST
Amravati: शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्रावर तुफान राडा  title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेची (Shri Shivaji Education Society Amravati) निवडणूक (Election) आज होत आहे. मात्र या निवडणुकीला गालबोट लागलंय. अमरावती इथल्या शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रावर दोन गटात तुफान राडा झाला असून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. मतदान केंद्रात लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार डॉ. दिनकरराव गायगोले (Dinkarrao Gaigole) यांचे बंधू रवींद्र गायगोले आणि  प्रगती पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार हेमंत काळमेघ (Hemant Kalmegh) यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. 

हा वाद विकोपाला गेल्याने दोघेही एक दुसऱ्याच्या अंगावर धावून गेले. या वादात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने मतदान केंद्र परिसरात गोंधळ उडाला. वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार (mla Devendra Bhuyar) आणि अकोटचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे (sanjay gawande) यांनीही या वादात उडी घेतली.

दरम्यान यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी एकाला काठ्यांचा प्रसाद देत त्याला ताब्यात घेतले. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने गाडगे नगर पोलीसानी बंदोबस्त वाढवला. घटनास्थळी ठाणेदार आसाराम चोरमले यांनी धाव घेत येत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान डॉक्टर दिनकर गायगोले आणि पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यात वाद झाला. आमदार पंकज भोयर सुद्धा घटनास्थळी दिसून आले. शिवाय नरेशचंद्र ठाकरे यांचे चिरंजीव विक्रम ठाकरे हे ही घटनास्थळी होत. आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्राच्या आत असल्याने काहींनी आक्षेप नोंदवला, मात्र मी प्रतिनिधी असल्याने मी आत मध्ये होतो तर मला धक्काबुक्की झाली नाही असं देवेंद्र भोयर यांनी सांगितलं.

शिक्षण संस्थेची निवडणूक
स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या आणि राज्यातील द्वितीय क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषेच्या 9 पदाकरिता आज सकाळी 8 वाजल्या पासून मतदान सुरुवात झालं.  शिवाजी शिक्षण संस्थेत एकूण 774 मतदार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे नेतृत्वाखाली प्रगती पॅनल, तर माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे विकास पॅनल परस्पराविरुद्ध मैदानात उभे आहेत. 

दोन्ही पॅनल मधील अध्यक्ष पदाकरिता 2, उपाध्यक्षपदाकरिता 6, कोषाध्यक्ष 2, कार्यकारणी सदस्य पदाकरिता 8 असे एकूण 18 तर 3 अपक्ष उमेदवार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. अपक्ष मध्ये डॉ. विठ्ठल वाघ, उपाध्यक्ष पदाकरिता आनंद देशमुख व डॉ. प्रमोद झाडे हे सदस्य पदाकरिता मैदानात असणार आहेत. एका उमेदवाराला 9 मते देण्याचा अधिकार असणार आहे.