'मला कुणी समजून घेत नाही' 14 वर्षांच्या मुलीने लिहिली चिठ्ठी आणि...

हसत्या खेळत्या वयात या मुलीने इतका टोकाचा निर्णय का घेतला असेल?  

Updated: May 13, 2022, 03:05 PM IST
'मला कुणी समजून घेत नाही' 14 वर्षांच्या मुलीने लिहिली चिठ्ठी आणि... title=
प्रतिकात्मक फोटो

अनिरुद्ध दवाळे, अमरावती, झी मीडिया : माझा स्वभाव वाईट आहे. मला कुणीच समजून घेत नाही, अशी चिठ्ठी लिहून एका 14 वर्षांच्या मुलीने राहत्या घरी ओढळणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना अमरावतीमध्ये समोर आली आहे.

अमरावतीमधल्या नांदगाव खंडेश्वर शहरातील ओंकारखेडा परिसरात ही मुलगी आपल्या कुटुंबांसह राहते. मुलीचे बाबा शेतात गेले होते, तर आई आणि लहान बहिण कामानिमित्ताने बाहेर होते. घरात कुणी नसल्याचं पाहून या मुलीने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर मुलीचा मृतदेह पाहून तिने हंबरडा फोडला.

मुलीने चिठ्ठीत काय लिहिलं?
मृत मुलगी ही नवव्या वर्गात शिकत होती. तिने एक चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. माझा स्वभाव वाईट आहे. मला कुणीच समजून घेत नाही. त्यामुळे मी गळफास घेऊन आत्महत्या करत आहे. अशा आशयाची चिठ्ठी लिहून आपल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन मुलीने आत्महत्या केली आहे

कुटुंबावर शोककळा
नेहमी हसत खेळत असणाऱ्या मुलीने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल एवढ्या लहान वयात का उचलले, याचं कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.