अमरावती: गावकऱ्यांच्या हल्ल्यात १ पोलीस ठार, १ गंभीर जखमी

दारू काढणाऱ्या टोळीचे हे कृत्य पाहून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Updated: May 27, 2018, 03:40 PM IST

अमरावती: गावठी दारूचा साठा पकडण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल रवी मडावी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून श्यामराव जाधव हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मांजरखेड गावात गावठी दारू पकडण्यासाठी गेले होते.  त्या दरम्यान गावातील अवैधमार्गाने दारू काढणाऱ्या टोळीने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात रवी मडावी या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला एक कर्मचारी जखमी झाला. आज (रविवार, २७ मे) सकाळी ९ ते १० च्या सुमारास ही घटना घडली.

परिसरात भीतीचे वातावरण

दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांनी तातडीने पावले उचलून तपास सुरू केला आहे. तसेच, पोलीस दलाच्या अतिरिक्त बळाची कुमकही घटना घडल्याच्या परिसरात दाखल झाल्याची माहिती आहे. 

नागरिकांतून संताप

दरम्यान, दारू काढणाऱ्या टोळीचे हे कृत्य पाहून गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.