कपिल राऊत, झी मीडीया, ठाणे : वीस वर्षांपूर्वी अवघा पाच वर्षांचा असताना अनाथ आश्रमातून एका अमेरिकन कुटुंबीयांनी दत्तक घेतलेल्या क्रिस्टोपर प्रवीण हुथ या २७ वर्षीय युवकाने आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी आज भिवंडी गाठली. त्याला लहानपणीच्या आठवणी बाबत भिवंडी शहर व शहरातील यंत्रमाग व्यवसाय याची पुसटशी आठवण असून, क्रिस्टोपर म्हणजेच लहानपणाच्या 'साई'च्या बहिणी शोधामुळे अवघी भिवंडी आता या भावा-बहिणींची रक्षाबंधनाला व्हावी यासाठी प्रार्थना करतेय.
क्रिस्टोपर प्रवीण हुथ पेशाने वॉशिंग्टनमध्ये शिक्षक आहे... ते फुटबॉलचे प्रशिक्षकही आहेत. हुथ हे गुरुवारी सायंकाळी भिवंडी शहरात चार अमेरिकन आणि दिल्ली येथील मित्र अभिषेक यांच्यासह दाखल झाला. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार त्याने मागील दोन महिन्यापासून भारतात आपल्या कुटुंबियांच्या शोधासाठी विविध ठिकाणी शोध मोहीम करीत असतानाच त्याला आपले बालपण भिवंडी शहरात गेल्याची पुसटशी कल्पना आली.
भिवंडी शहर या शहरातील यंत्रमाग व्यवसाय हे आठवत असून आपले भाऊ दीपक व सागर हे यंत्रमाग कारखान्यात काम करण्यासाठी दररोज जात असल्याचे आठवत असून आपली सात वर्षीय बहीण आशा आपणास लाडाने साई म्हणून बोलवायची हे तो सांगत आहे. आपल्या घरच्या गरिबीमुळे मला व बहिणीस अनाथ आश्रमात ठेवल्यानंतर तेथून आपण अमेरिकन कुटुंबियांकडे दत्तक गेलो असल्याची माहिती तो देत आहे. त्यासाठी क्रिस्टोपर प्रवीण हुथ त्याच्या मित्रांसह तहसीलदार कार्यालयात आल्याने त्याच्या कुटुंबियांच्या शोध मोहिमेचे त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना कुतूहल वाटतंय.
क्रिस्टोपरच्या कुटुंबियांच्या शोधण्याच्या कार्यात त्याचे अमेरिकन मित्र miles ,wyatt , jack हे त्याच्या लहानपणापासून अमेरिकेतील सोबती व भारतातील दिल्ली येथील अभिषेक त्याला मदत करीत असून त्याला त्याच्या आई व बहिणीची भेट होण्याची आतुरता लागली आहे.
रक्षाबंधनाचा सण दोन दिवसांवर आलाय... आणि एक भाऊ आपल्या बहिणीच्या शोधात आहे... यावर्षी तरी त्याच्या हातावर बहिणीची राखी बांधली जाईल, अशी प्रार्थना क्रिस्टोपरसह अवघे भिवंडीकर करत आहेत.