अकोला : काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत जागांचा प्रश्न नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याच्या मुद्यावर बोलणी रखडलेली असल्याचे भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते अकोल्यात बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा होणार आहे. विखे पाटील यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जितेंद्र आव्हाड, वंचित बहुजन विकास आघाडीकडून लक्ष्मण माने या बैठकीला उपस्थित आहेत. प्रकाश आंबेडकर अकोल्यात आहेत, त्यामुळे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांना मुंबईत ठेवण्यात आलेल्या नजरकैदेचा प्रकाश आंबेडकरांनी निषेध केला. सरकारची ही कृती चिथावणीखोर असून याचा उद्रेक होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भिमा- कोरेगावच्या विजय स्तंभाचं शांततेत दर्शन घेण्याचं आवाहन आंबेडकरांनी जनतेला केले आहे. दरम्यान, आंबेडकरांनी आपण लोकसभा मुंबईसह सोलापूर, अकोला, नागपूर अशा कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतो असं सांगत आपल्या मतदारसंघाबाबत संदिग्धता ठेवली आहे.
आपण काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून आंबेडकरांनी चव्हांणांना चांगलीच टोला लगावला. यासंदर्भात आपण अशोक चव्हाणांना बोलण्याचं वकिलपत्र दिलेले नसल्याचे आंबेडकर म्हणालेत. देशात अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वात तिसरी आघाडी अस्तित्वात येईल. मात्र, आपण राज्यातच बरे आहोत, असे सांगत आंबेडकरांनी या आघाडीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.