'अध्यक्ष नसतो तर मीही संमेलनावर बहिष्कार टाकला असता'

'नयनतारा सहगल हे नाव महिनाभर आधीच निश्चित झालं होतं...'

Updated: Jan 8, 2019, 12:43 PM IST
'अध्यक्ष नसतो तर मीही संमेलनावर बहिष्कार टाकला असता' title=

नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक आणि लेखिका नयनतारा सेहगल यांना निमंत्रण नकार निर्णयाबाबत माझ्यावर आऱोप करण्यापूर्वी आयोजकांनी कृपया वास्तव समजून घेण्याची गरज होती, असं मत महामंडळाचं अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केलं आहे. 'महामंडळाचा अध्यक्ष नसतो तर आज मीही नयनतारा सहगल यांना नकार देण्याच्या निर्णयानंतर संमेलनावर बहिष्कार टाकणाऱ्यांचं नेतृत्व केलं असतं', असंही जोशी यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितलं. 

नयनतारा सहगल हे नाव महिनाभर आधीच निश्चित झालं होतं. त्यांचं नाव रद्द करण्याचा आणि निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय माझा नव्हता... वादानंतर मी केवळ पत्राचा मसुदा इंग्रजीत लिहून दिला... संस्था आणि व्यक्तीगत भूमिकेची सरमिसळ नको, असं म्हणत श्रीपाद जोशींनी आयोजकांवर जबाबदारी ढकललीय. 

दुसरीकडे, नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय हा आयोजकांचा नसून 'अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा'चा असल्याचा खुलासा कार्याध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते यांनी केला आहे. झाल्या प्रकाराबाबत आयोजकांनी दिलगिरी व्यक्त करून निमंत्रित सर्व साहित्यिकांना संमेलनासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे, अशी माहिती डॉ. कोलते यांनी दिलीय. नयनतारा या इंग्रजी भाषेतून लिखाण करतात त्यामुळे त्यांना मराठी साहित्य संमेलनात विरोध झाल्याचं कोलते यांनी म्हटलंय. 

११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचे उदघाटन प्रख्यात साहित्यिक नयनतारा सहगल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होतं. मात्र, वादानंतर नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं.