अजितदादांनी पवारांचं घर फोडलं?, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

Updated: Nov 24, 2019, 08:47 AM IST
अजितदादांनी पवारांचं घर फोडलं?, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भावना title=

मुंबई : अजित पवारांनी शरद पवारांचं घर फोडल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. गेल्या दोन ते तीन महिने शरद पवार भाजपविरोधात ठाम उभे असताना अजित पवारांनी भाजपासोबत घरोबा केला. 

शरद पवार दैवत आहेत आणि घर फुटणार नाही असा दावा करणाऱ्या अजित पवारांनी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्यानं शरद पवारांविरोधात भूमिका घेतली. जेव्हा शरद पवारांनी ईडीविरोधात रान उठवलं होतं. तेव्हा अजित पवारांनी त्या आंदोलनाला विरोध केलाच शिवाय आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवारांनी तय़ार केलेली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते प्रकरण सांभाळताना राष्ट्रवादीच्या नाकीनऊ आले होते.

निवडणूक जाहीर झाली. शरद पवार प्रचारासाठी राज्यभर फिरत होते. अजित पवार मात्र हातचं राखून होते. जेव्हा निकाल लागला. शिवसेनेसोबत आघाडीची चर्चा सुरु झाली. तेव्हा अचानक काँग्रेससोबतची बैठक रद्द झाल्याचं सांगून त्यांनी एकच खळबळ माजवून दिली. तेव्हाही अजित पवारांची बाजू सांभाळून घेताना राष्ट्रवादीची तारांबळ उडाली होती.

संबधित बातमी: सुप्रिया सुळेंचं अजित दादांना भावनिक आवाहन

महाविकासआघाडीचं ठरलं तेव्हा बैठकांचा सपाटा सुरु झाला. या बैठकांमध्ये हजर असूनही अजित पवार कुठंच नव्हते. त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकारचा रिमोट शरद पवाराच्या हातात आला असतानाच अजित पवारांना एका रात्रीत शरद पवारांनी मांडलेला डाव बिघडवला. अजित पवारांनी प्रत्येकवेळी शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली. त्याची जबरदस्त राजकीय किंमत अजित पवारांना मोजावी लागण्याची शक्यता आहे.