Ajit Pawar Violated Traffic Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात वाहतुकीचे नियम मोडल्याचे समोर आलं आहे. एकीकडे लोकांची वाहने सिग्नलजवळ थांबलेली असताना दुसरीकडे अजित पवारांचा ताफा मात्र उलट्या दिशने रवाना झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकाजवळ हा संपूर्ण प्रकार घडला. अजित पवार पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दौरे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यात गेले होते. यावेळी पुण्यात मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
यादरम्यान अजित पवार हे पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेले होते. यावेळी ते जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून पुन्हा बाहेर आले. यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा हा उलट्या दिशेने गेला. विशेष म्हणजे पोलिसांनीही त्यांना अडवले नाही. यावेळी इतर वाहने थांबलेली होती. पण उपमुख्यमंत्र्यांचा ताफा मात्र उलट्या दिशेने सुसाट गेल्याचे पाहायला मिळाले. आता अजित पवारांचा उलट दिशेने वाहनांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तसेच यानंतर पुण्यातील रस्त्याला कचऱ्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीनंतर पुण्यातील अनेक रस्त्यांवर खाद्यपदार्थांचे डब्बे, थंड पेये यांचा कचरा जमा झाला होता. याचेही अनेक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.
दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. तर भाजपने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना धंगेकरांविरोधात उमेदवारी दिली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी मनसेमधून बाहेर पडलेले वसंत मोरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदा पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
तर शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात लढाई पाहायला मिळणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवारांनी शिंदे गटातून आयात केलेल्या शिवाजी आढळराव पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे.