...तर आम्ही तिघे दिल्लीला जाऊ; अधिवेशन संपण्याआधीच अजित पवारांचं विधान

Ajit Pawar Said He Will Visit Delhi: अजित पवार यांनी विधानसभेच्या आवारामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करताना दिल्लीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भातील खुलासा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 14, 2023, 11:32 AM IST
...तर आम्ही तिघे दिल्लीला जाऊ; अधिवेशन संपण्याआधीच अजित पवारांचं विधान title=
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांचं विधान

Ajit Pawar Said He Will Visit Delhi: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या म्हणजेच शुक्रवारी विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर नवी दिल्लीला रवाना होणार असल्याचं म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण आज सायंकाळी विधानसभेचं काम वेळेत संपलं तर दिल्लीला रवाना होणार आहोत असं म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांशी विधानसभेबाहेर नागपूरमध्ये चर्चा करत असताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. 

...म्हणून दिल्लीला जाणार

अजित पवार यांनी आपण बुधवारी अमित शाहांना भेटल्याचं सांगितलं. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ शपथविधीसाठी अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भोपाळला गेले होते. मोहन यादव यांच्या शपथविधीमध्ये सहभागी झाल्याचं सांगताना, "काल आम्ही अमित शाहांना भेटलो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आम्ही तिघेही गेलो होतो. त्यांच्याबरोबर बोलताना आम्ही कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न याबद्दल बोललो. तसेच दुधाचा प्रश्नही त्यांच्याकडे मांडला. मात्र आम्ही इथेनॉल आणि कांदा प्रश्नी चर्चा करण्यासाठी तुमची वेळ हवी आहे असं त्यांना सांगितलं. त्यांनी 15 तारखेची वेळ दिली आहे," असं अजित पवार म्हणाले.

"ते (अमित शाह) 15 आणि 16 तारखेला भेटू शकतात. 16 तारखेला विधानसभेच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की 15 तारखेला विधानसभेचं कामकाज सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपलं तर सायंकाळी आम्ही तिघे दिल्लीला रवाना होऊ. त्यांनी रात्री 9 ते 10 च्या आसपास वेळ देण्यास संमती दर्शवली आहे," असं अजित पवार म्हणाले.

पेन्शन योजनेच्या बैठकीत काय चर्चा झाली? 

जुन्या पेन्शन योजनेसाठी जी बैठक झाली त्यात तोडगा निघाला का? आजपासून संप आहे, असा प्रश्न अजित पवारांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी, "मुख्य सचिव, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, मी स्वत:, काही लोकप्रतिनिधी आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. वेगवेगळ्या कामगार संघटनेचे पदाधिकारीही हजर होते. 3 लोकांच्या कमिटीचा अहवाल मिळाला आहे. अहवालाबद्दल फायनान्स, मुख्य सचिवांनी कामगार नेत्यांशी चर्चा करा. आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन द्यायची आहे. केंद्र सरकारचं याबद्दल अभ्यास चालू असल्याचं, त्यांनी समिती नेमल्याचं मी सभागृहात सांगितलं. आम्हाला त्याच्याशी काही हे लिंकअप करायचं नाही. पण ते आलं तर ते ही पाहूयात. तो अहवालही तपासला जाईल," असं म्हटलं.

"कर्मचाऱ्याच्या, अधिकाऱ्यांच्या पेन्शनबाबतीतचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. निवडणुकीच्या आधी नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ. मी त्यांना सांगितलं की अंमलबजावणी 2032-33 ला सुरु होणार आहे. तरी त्यांनी मार्ग काढण्याची मागणी केली. त्यांचे 4 ते 5 प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. त्यामुळे 2005 मधील शिक्षक सेवक म्हणून लागले नंतर कायम झाले त्यांचा प्रश्न सोडवला. इतर 3 ते 4 प्रश्नही सोडवले. येणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत आम्ही निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री म्हणाले. जास्त ताणून न धरता टोकाची भूमिका घेऊ नये असं सांगितलं. संप मागे घ्या सरकार पॉझिटीव्ह आहे," असं अजित पवार म्हणाले.