Ajit Pawar : आम्ही महिलांना संधी देतो, पण...; उर्फी जावेदच्या वादावर अजित पवारांची मिश्किल शब्दात फटकेबाजी

Urfi javed vs Chitra wagh : उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन आक्रमक होत चित्रा वाघ यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. उर्फीविरोधात चित्रा वाघ यांनी पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे.

Updated: Jan 6, 2023, 01:18 PM IST
Ajit Pawar : आम्ही महिलांना संधी देतो, पण...; उर्फी जावेदच्या वादावर अजित पवारांची मिश्किल शब्दात फटकेबाजी title=

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात वेगळा वाद रंगलाय. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन आक्षेप घेत चित्रा वाघ कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. उर्फीविरोधात चित्रा वाघ यांनी थेट मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. चित्रा वाघ यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

चित्रा वाघ यांची महिला आयोगावरही टीका

यासोबत राज्य महिला आयोगावरही चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं, असं प्रत्युत्तर दिलं. 

आम्ही महिलांना संधी देतो - अजित पवार

याबाबत आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. "हे महिला महिलांचं चाललं आहे. आम्ही महिलांना संधी देतो. त्याची माती करायची का सोन हे त्यांच्या हातात आहे," असे अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं आहे.

उर्फीच्या नादात राष्ट्रवादीच्या आजी माजी नेत्याच भिडल्या

दुसरीकडे उर्फीनंतर चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातच वाद पेटला आहे. उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी करत चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर याच्यावर टीका केली होती. महिला आयोग उर्फी जावेदचे समर्थन करतंय का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला होता. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

आयोग यात वेळ वाया घालवू शकत नाही - रुपाली चाकणकर

"प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातूनही कुणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला, तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांनाही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही," असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.