'लाडकी बहीण'साठी योजनेसाठी पैसा कुठून आणणार? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर

Ladaki Bahin Yojana: राज्यावर कर्जाचं ओझं असताना सरकारने केवळ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 27, 2024, 02:52 PM IST
'लाडकी बहीण'साठी योजनेसाठी पैसा कुठून आणणार? अजित पवारांनी विरोधकांना दिलं उत्तर title=
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये मिळणार आहेत. यानंतर लाडक्या भावांसाठी काय देणार? असा प्रश्न विरोधक सरकारला विचारु लागले. पुढे जाऊन राज्य सरकारने लाडका भाऊ योजना सुरु केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निधी दिली जाणार आहे. अशा विविध योजनांची घोषणा केल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा सरकारवर टीका होऊ लागली आहे. राज्यावर कर्जाचं ओझं असताना सरकारने केवळ आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून ही घोषणा केल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विरोधकांना उत्तर दिले आहे. 

काय म्हणाले अजित पवार?

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याचे ते म्हणाले. 

35 हजार कोटींची अर्थसंकल्पात तरतूद

चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य असल्याचेही अजित पवारांनी सांगितले. 

रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी 

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही, असे अजित पवारांनी सांगितले. 

योजनेला वित्त विभागाचा विरोध?

काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.