Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची (Baramati Loksabha Election 2024) जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. आता सुनेत्रा पवारांच्या झालेल्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोड वरती आले आहेत. बारामतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात राजीनामे द्यावेत असे आदेशच अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे शहर, तालुक्यात आता भाकरी फिरवली जाणार असून, नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना संधीचा मार्ग मोकळा झालाय. बारामतीत अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात पवार यांनी पदाधिकाऱ्यांकडे राजीनामे मागितलेत. 15 ऑगस्टपूर्वी पदाधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती केली जाणार आहे. त्यात निष्ठावंतान संधी दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
बारामतीची लढाई प्रतिष्ठेची
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला. काही लोकं भावनिक आवाहन करतील, तुम्ही भावनेला बळी पडू नका असं आवाहन करत अजित पवारांनी मतदारांना साद घातली. आतापर्यंत 'तुम्ही लेकीला निवडून दिलंत आता सुनेला निवडून द्या' असं म्हणत अजितदादांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण मतदारांनी आपला कौल सुनेच्या पारड्यात न टाकता पुन्हा लेकीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं.
पवार विरुद्ध पवार झालेल्या या बारामतीच्या लढतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.. मात्र शरद पवारांनी बाजी मारत आपणच वस्तात असल्याचं सिद्ध केलं. यामुळे अजित पवार चांगलेच नाराज झाले होते.
सुनेत्रा पवार राज्यसभेत
सुनेत्रा पवार यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यंना राज्यसभेत पाठवण्यात आलं. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. बारामतीत का पराभव झाला यावर आत्मचिंतन करत आहोत. जनतेने कौल दिला त्याचा स्वीकार करते. येणाऱ्या निवडणुकीत असे घडणार नाही असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला होता.