पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकला आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडले आहे.! राज्यातल्या काना कोपऱ्यातून राष्ट्रवादीचे नेते शहरात दाखल झालेत. तर दुसरीकडे सेनेच्या श्रीरंग बारणे यांची एकाकी झुंज असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
शरद पवारांचा नातू, अजित पवारांचा पूत्र असलेल्या पार्थ पवार यांच्या उमेदवारी मुळे मावळ लोकसभा मतदार संघ कमालीचा चर्चेत आला. पण मतदार संघात येणाऱ्या सहा पैकी पाच ठिकाणी आघाडीचे आमदार असल्याने राष्ट्रवादीला ही लढाई सोपी नसल्याचा अंदाज आला आहे. म्हणूनच बारामतीची जबाबदारी संपताच अजित पवारांनी २३ तारखेला रात्रीच पिंपरी चिंचवड गाठले.
धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी ही शहरात विशेष लक्ष घातले आहे. तर आमदार सतीश चव्हाण, राणा जगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, मल्हार पाटील, दिलीप सोपल, माढ्याचे उमेदवार संजय शिंदे शहरात दाखल झाले आहेत. बारामतीमधून कार्यकर्त्यांची मोठी रसद शहरात दाखल झाली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून संपूर्ण ताकत पणाला लावली जात असताना भाजप नेत्यांनी मात्र त्याच्यावर टीका केली.
दुसरीकडे श्रीरंग बारणे यांची मात्र एकाकी झुंज असल्याच दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी सभा घेत बारणेंना हात देण्याचा प्रयत्न केलाय खरा, पण राष्ट्रवादीच्या फौजफाट्याचा विचार करता बारणे चक्रव्यूहात अडकले असल्याचे चित्र आहे.