Maharashtra Politics : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राज्यातल्या राजकारण गेल्या काही महिन्यांपासून ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर टीका सुरु आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एका त्यांना लक्ष्य केले आहे. जुन्नरमध्ये बोलताना अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबाबत भाष्य केलं आहे.अजित पवारांनी पक्ष सोडून आणि पक्षाची मूळ विचारधारा सोडून भाजपाबरोबर चूल मांडली, असा आरोप केल्यानंतर अजित पवारांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार यांची गुरुवारी जुन्नरमध्ये सभा पार पडली. यावेळी शरद पवार गटाने केलेल्या टीकेला अजित पवारांनी भर सभेत प्रत्युत्तर दिलं. शरद पवारांनी वयाच्या 38 व्या वर्षी वेगळी चूल मांडत बंड केलं, मात्र आम्हाला 60-62 वर्षं वाट पाहावी लागली असेही अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता जुन्नर इथल्या सभेत अजित पवारांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले अजित पवार?
"शिवसेनेबरोबर सत्तेत बसलेलं चालतं, मग भाजपाबरोबर सत्तेत बसलेलं का चालत नाही? उद्धव ठाकरे यांचं सरकार आता जातंय हे समजलं होतं त्याचवेळी पक्षातील सगळ्यांनी ठरवलं होतं की, आपण आता भाजपाबरोबर सरकारमध्ये जायचं. महाविकास आघाडीत शिवसेनेबरोबर सरकारमध्ये सामील झालेलं चालतं, मग महायुतीत भाजपबरोबर गेलं तर का चालत नाही? राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत असतात. परंतु, वरिष्ठांनी निर्णय घेतला तर तो बरोबर आणि आम्ही घेतला तर तो चूक. असं कसं चालेल?," असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
दरम्यान, गुरुवारी विधिमंडळात झालेल्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी अजित पवार गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी राष्ट्रवादीचे शरद गटाचे नेते जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांचे जबाब नोंदवण्यात आले. सुनावणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित गटाने पक्षाच्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विभागाचे नामनिर्देशित अध्यक्ष होते. निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना हे पद देण्यात आले नाही. अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितले की, पाटील यांचा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यकाळ 2022 मध्ये संपणार आहे. यावर शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. ते अजूनही राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.