अहमदनगर लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचा  विचार केला तर नगर जिल्ह्याच्या राजकारणात या मतदारसंघाचा कायम दबदबा राहिलाय. 

Updated: Jul 6, 2018, 01:48 PM IST

मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचा  विचार केला तर नगर जिल्ह्याच्या राजकारणात या मतदारसंघाचा कायम दबदबा राहिलाय. इथून निवडून आलेले चार खासदार केंद्रात मंत्री झाले, पण या जिल्ह्यासाठी ते भरीव असं काहीच करू शकले नाहीत... विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी इथं महापालिका स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. नगरला विमानतळ व्हावं, यासाठी आग्रह धरला. पण विमानतळ उत्तर नगरमध्ये नेण्यात तिथले नेते यशस्वी झाले. शहराच्या विकासासाठी खासदार निधीतून कोट्यवधी रूपयांची कामं केल्याचा दावा दिलीप गांधी करतात.

अमृत योजनेत गांधी यांनी एकूण २६० कोटींचा निधी आणला. त्यात भुयारी गटारयोजना, शहराची पाणी योजना आणि सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी लागणार आहेत. हे काम ७० टक्के पूर्ण झालंय. पुणे मुंबई, औरंगाबाद , सोलापूर , बीड लातूर उस्मानाबाद या शहरात जाण्यासाठी नगरमधूनच जावं लागतं. त्यामुळं वाहतुकीचा प्रचंड ताण नगर शहरावर आहे. त्यासाठी नगर शहरातून जाणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण आवश्यक आहे. 

नगरला उड्डाण पूल आणि मजबूत रिंग रोडची गरज आहे. यातला २७८ कोटींचा उड्डाणपूल गांधी यांनी मंजूर करून आणलाय. ६५० कोटींचा निधी नगर काष्टी बारामती  रोडसाठी आणला. नगर सोलापूर रस्त्यासाठी  २६०० कोटींचा निधी मंजूर झालाय. हा रस्ता आता ६ पदरी होणार आहे. यात नगर ते पंढरपूर पालखी मार्गाचाही समावेश आहे. पुणे औरंगाबाद रस्ता आठ पदरी होणार आहे. त्यासाठी १२०० कोटींचा खर्च येणार आहे. 

दिलीप गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडं पाठपुरावा करून नगर शहरातून जाणाऱ्या सर्व ९ महामार्गांचा अंतर्भाव राष्ट्रीय महामार्गात करून घेतला. त्यामुळंच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकला. नगरची औद्योगिक वसाहत मोठी व्हावी यासाठी विशेष प्रयत्न झाले.

नगरमधून जाणाऱ्या रेल्वेमार्गाची स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाताहत झालीय.  दौंड मनमाड या दोन जंक्शनला जोडणारा रेल्वे मार्ग नगरमधून जातो, पण त्या मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरण नुकतंच झालंय. नगर दौंड मार्गात कष्टीपासून पुण्यातील केडगावपर्यंत कॉड लाईन टाकण्याच्या कामाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिलीय.  त्यामुळे हा प्रवास आता दोन तासावर येणार आहे. नगर बीड परळी या रेल्वे मार्गासाठी ११५० कोटी रुपये आले आहेत. ८ कोटी रुपये खर्च करून नगर रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलंय.

खासदार दिलीप गांधी यांनी आतापर्यंत २५० सभा मंडप विविध गावात बांधून दिले आहेत .  , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार   काम्बी , कासारे ,   , लोहसर  ही तीन गावे दत्तक घेण्यात आली. तिथे विविध ग्रामविकासाची कामे प्रगतीपथावर आहेत , आणखी ३७ गावे विशेष कामे करण्यासाठी निवडण्यात आली आहेत. नगर जिल्ह्याला पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी फार वर्षांपासून होती तीही गांधी यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाली आहे .   

नगर जिल्ह्यातल्या शेतीसाठी आणि पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी अजून प्रयत्न होणे गरजेचे आहे मात्र तो विषय राज्य शासनाच्या अखत्यारीतला आहे . भाजप खासदार म्हणून दिलीप गांधी यांनी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या १४ तालुक्यांच्या नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी फार वर्षांपासूनची आहे मात्र ही मागणीही अजून पूर्ण झालेली नाही.