विधानभवन आवारात सापडल्या बिअरच्या बाटल्या

विधानभवनात पाणी साचलं

Updated: Jul 6, 2018, 01:44 PM IST
विधानभवन आवारात सापडल्या बिअरच्या बाटल्या  title=

नागपूर : नागपूर विधानभवन आवारात बिअरच्या बाटल्या सापडल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. विधानभवन परिसरातून पाण्यात निचरा करणाऱ्या गटारांमध्ये या बिअरच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे बिअरच्या बाटल्यामुळेच पाणी तुंबल्याचं आता बोललं जातं आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरच या बाटल्या गटारीतून बाहेर काढण्यात आल्या आहेत. नागपुरात आज सकाळपासून मुसळधार पावसामुळे विधानभवन परिसरातही पाणी साचलं होतं. त्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता. 

महाराष्ट्र विधीमंडळाच्या इतिहास बहुदा प्रथमच पावसामुळे संपूर्ण दिवसाचं कामकाज तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी पक्षावर आली आहे. होय मोठ्या हौसेनं पावसाळी अधिवेशन नागपूर नेणाऱ्या सरकारलाच पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा चांगलाच हिसका बसला आहे. मुसळधार पावसानं विधीमंडळातला वीज पुरवठाच खंडीत झाल्यानं दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. 

काल संध्याकाळपासून नागपूरमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. पावसानं विधीमंडळ परिसरात गुडघ्याभर पाणी साचलं. शिवाय दोन्ही सभागृहात वीजपुरवठा खंडित झालाय. त्यामुळे एसी यंत्रणा देखील ठप्प आहे. त्यामुळे आजचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.