नगरमध्ये भाजपकडून शिवसेनेला धोबीपछाड; राष्ट्रवादीशी युती करत महापौरपदावर कब्जा

राष्ट्रवादीच्या संपत बारस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

Updated: Dec 28, 2018, 12:15 PM IST
नगरमध्ये भाजपकडून शिवसेनेला धोबीपछाड; राष्ट्रवादीशी युती करत महापौरपदावर कब्जा title=

मुंबई: राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर महानगरपालिकेतील महापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती करत सगळ्यांनाच धक्का दिला. महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती असल्यामुळे कोणत्या पक्षांची युती होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, आज सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच गाडीतून आले. यानंतर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे व राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी हातात हात घालूनच महापालिकेत प्रवेश केला. यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीच्या संपत बारस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बाबासाहेब वाकळे यांचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला. त्यांना एकूण ३७ मते पडली. यामध्ये भाजपचे १४, राष्ट्रवादीची १८, बसपाचे ४ आणि एका अपक्षाचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या बोराटे यांना २३ मते मिळाली.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सकाळपासूनच नगरमध्ये ठाण मांडून होते. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. तर २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. मात्र, याठिकाणी सेना-भाजपमधून विस्तवही जात नाही. सेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड व भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. परिणामी शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे महापौरपदाचा तिढा कसा सुटणार, हा पेच होता. अखेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महापौरपदाची निवडणूक जिंकली.

दरम्यान, या निवडणुकीवेळी वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यामुळे गोंधळ उडाला. श्रीपाद छिंदम पोलीस संरक्षणात मतदानासाठी आला होता. आवाजी मतदानाच्या प्रक्रियेत त्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मत दिले. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक प्रचंड संतापले. आम्हाला हे मत नको, असे सांगत काहीजण छिंदमच्या अंगावर धावून गेले. यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.