PUBG च्या माध्यमातून धर्मांतर? संगमनेरमध्ये बिहारच्या तरुणाला अटक

Ahmednagar Crime : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता अहमदनगरच्या संगमनेरमध्ये धर्मातराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 17, 2023, 10:32 AM IST
PUBG च्या माध्यमातून धर्मांतर? संगमनेरमध्ये बिहारच्या तरुणाला अटक title=

योगेश खरे, झी मीडिया नाशिक : ऑनलाइन गेमद्वारे (Online Game) मुलांचे धर्मांतर (conversion) करण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या शाहनवाज खान उर्फ ​​बड्डो याला अटक करण्यात आली आहे. शाहनवाजला काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. शाहनवाज खान हा या रॅकेटचा म्होरक्या असल्याचे म्हटलं जात आहे. अशातच आता तरुणाईला वेड लावणाऱ्या पब्जी गेमच्या (PUBG) माध्यमातून अहमदनगरच्या संगमनेर (Sangamner) इथल्या एका गावातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी (Maharashtra Police) याप्रकरणी एका अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. 

अक्रम शाहाबुद्दिन शेख असे आरोपीचे नाव असल्याचे माहिती समोर आली आहे. संगमनेर पोलिसांनी अक्रम शेखला अटक केली आहे. संगमनेर इथल्या एका 22 वर्षीय पीडित तरुणीशी पब्जी बिजीएमआय गेमच्या माध्यमातून आरोपी अक्रम शाहाबुद्दिन शेखने ओळख केली होती. हा आरोपी मूळचा अलीनगर जिल्हा दरभंगा बिहार येथील आहे. अक्रमसोबत त्याचा एक मित्र नेमितुल्ला हादेखील थेट बिहारहून संगमनेरात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरु केला आहे.

पब्जीतून वाढवली ओळख

अक्रम शाहाबुद्दिन शेखने पब्जी गेमच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर तरूणीला भेटण्यासाठी थेट संगमनेर गाठले होते. तरुणीसोबत गोड गोड बोलत आरोपी अक्रम तिला एका निवांत जागेत घेऊन गेला. काहीतरी चुकीचे घडत आहे हे पीडित तरुणीच्या लक्षात येताच ती घरी जाऊ लागली. त्यावेळी आरोपी अक्रम पीडित तरुणीसोबत बळजबरी करायला लागला आणि आपण बिहार ला जाऊ लग्न करू असे सांगायला लागला. तरुणीने पळण्याचा प्रयत्न करताच तुझे व्हिडिओ बनवून मारून टाकू अशी धमकी अक्रम आणि त्याच्या मित्राने दिली.

त्यानंतर तरुणीने आपल्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अक्रमला ताब्यात घेतले. तपासामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये तो अनेक हिंदू मुलींच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पब्जी गेम खेळण्याच्या माध्यमातून मुलींची मैत्री करून धर्मांतरण करण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक निष्कर्षामध्ये समोर येत आहे. दरम्या या मुलाने आतापर्यंत किती मुलींना फसवले आहे याचा तपास पोलीस करत आहेत.