'सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारु पिऊन...' पण बंडातात्यांचे आरोप ठरले 'बडबड'

माझ्या वक्तव्याचं भांडवल केलं गेलं, वादग्रस्त वक्तव्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी मागितली माफी

Updated: Feb 4, 2022, 04:15 PM IST
'सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारु पिऊन...' पण बंडातात्यांचे आरोप ठरले 'बडबड' title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा  : सुपरमार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हभप बंडातात्या कराडकर यांनी विरोध केला आहे. सरकराच्या निर्णया विरोधात साताऱ्यात वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्त युवक संघाने दंडवत मोर्चा काढण्यात आला. 

हे आंदोलन इथंच थांबणार नाही यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशारा यावेळी ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी  दिलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

सर्व नेत्यांची मुलं दारू पितात

हभप बंडातात्या कराडकर यांनी सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर दारु पिण्याचे आरोप केले. या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारुपिऊन रस्त्यावर नाचतात असा आरोप बंडातात्या यांनी केला. सुप्रिया सुळे दारुपिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो तुम्हाला ढिगाने मिळतील. राजकारणात येण्याआधी त्या दारुपिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतायत. 

पंतगराव कदम यांचा एक मुलगा कसा मेला? दारुच्या नादात कसा गेला शोधा. कऱ्हाडचे आमदार बाळासाहेब पाटील यांचा मुलगा दारु पितो की नाही? असा सवाल करत बंडातात्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या.

वादग्रस्त वक्तव्यानंतर मागितली माफी

या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी आपल्या वक्तव्याचं भांडवल केलं गेलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच माझं चुकलं असेल तर क्षमा मागायला मी तयार आहे, चुकीचं वाक्य बोललं गेलं असेल तर क्षमा मागायचा कमी पणा कुठला आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी सांगितलं.

बंडातात्या कराडकर हे वारकरी संप्रदायातून येतात पण तेच संताची शिकवण आज आरोप करताना विसरले, म्हणून त्यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की आली. 

श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।। शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।। तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा करू।।’ देवाने माणसाला विचार करण्याची क्षमता दिली आणि त्याचबरोबर अभिव्यक्त होण्यासाठी शब्दशक्ती बहाल केली.