नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे यांची सुपारी देऊन हत्या, हत्येची सुपारी दिली या व्यक्तीने...

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ अखेर सुटलंय. डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृत्यू कसा झाला, यावर अनेक दिवसापासून प्रश्नचिन्ह लावले जात होते. 

Updated: Feb 3, 2022, 06:41 PM IST
नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे यांची सुपारी देऊन हत्या, हत्येची सुपारी दिली या व्यक्तीने... title=

योगेश खरे, झी २४ तास, नाशिक :  डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ अखेर सुटलंय. डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृत्यू कसा झाला, यावर अनेक दिवसापासून प्रश्नचिन्ह लावले जात होते. पण पोलिसांनी अखेर या प्रकरणाला धसास लावलं आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी पत्नी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पण अखेर १० दिवसाच्या तपासानंतर या प्रकरणात यूटर्न आला आणि डॉ सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे याला अटक केली आहे.

संदीप वाजे यांनी आपल्या पत्नीची सुपारी देऊन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे, या हत्येप्रकरणात सामिल असलेल्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

महापालिकेच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे नजीक जळालेल्या अवस्थेत आढळला होता. गाडीत आढळलेला मृतदेह आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए एकच असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे डॉ. सुवर्ण वाजे मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले होते.

या प्रकरणात या आधी डॉ. सुवर्णा वाजे यांचे पती यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर डॉ. सुवर्णा वाजे या गाडीसह जळालेल्या अवस्थेत मिळाल्या होत्या. मात्र तो मृतदेह सुवर्णा वाजे यांचाच होता की दुसऱ्या कोणाचा ही माहिती मिळत नव्हती. 

आता डीएनए तपासातून ती माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नाशिक पोलिसांच्या तपासानुसार, डीएनए एकच असल्याने आता डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. वाजे यांच्या हाडाचा डीएनए अहवाल नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन जाळण्यात आल्याचा अंदाज होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अखेर हे प्रकरण उकरुन काढलं आहे.