खेड-शिवापुर टोल नाक्यावरील दरवाढ थांबवली; 'या' कारणामुळं घेतला निर्णय

Khed Shivapur Toll Price Hike: सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर एप्रिलपासून टोलच्या दरात करण्यात आलेली दरवाढ रद्द करण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 4, 2024, 02:24 PM IST
खेड-शिवापुर टोल नाक्यावरील दरवाढ थांबवली; 'या' कारणामुळं घेतला निर्णय title=
After EC directive no toll fee hike on Pune Satara

Khed Shivapur Toll Price Hike: पुणे सातारा महामार्गावरील खेड-शिवापुर टोलनाक्यावर एक एप्रिलपासून होणारी टोलवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळं काही काळासाठी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आचारसंहितेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही टोलवाढ थांबवण्यात आली आहे. तसे पत्र टोल व्यवस्थापकांना देण्यात आले आहे. 

सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर एप्रिलपासून टोलची दरवाढ करण्यात आली होती. एक एप्रिलपासून सुमारे अडीच टक्के टोल वाढ होणार असल्याचे टोल रोड प्रशासनामार्फत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. तसंच, प्रवाशांनी या टोल वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून टोलवाढ थांबविण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ही नवीन टोल दरवाढ लागू करण्यात येईल," अशी माहिती पुणे सातारा टोल रोडचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या देशभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वाढीव टोल दरवाढ थांबविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी वाहन चालकांना पुर्वीचाच टोल भरावा लागणार आहे. 

किती करण्यात आली होती दरवाढ?

प्रशासनाने पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, कार, जीप व हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार होती. तर, हलक्या व्यवसायीक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होणार होती. या दरानुसार, वाहनांना 185 ऐवजी 190 रुपये द्यावे लागणार होते. 

बस आणि ट्रेकसाठी दहा रुपयांची वाढ होणार होती. त्यामुळं 400 रुपये टोल भरावा लागणार होता. जड वाहनांसाठी 415 रुपयांवरुन पाच रुपये वाढणार होता. तसंच, अवजड वाहनांसाठीच्या 615 रुपये टोल मध्ये 15 रुपयांची वाढ होणार होती. मात्र, आता सध्या टोलवाढीच्या निर्णयाला स्थगीती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांनंतर टोलदरात वाढ होण्याची शक्यता आहे.