रत्नागिरी : भाजपा-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. मात्र शिवसेना विश्वासघात करणार नाही, असा दावा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी झी २४ तासशी बोलताना केला आहे. विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, हे जनता ठरवेल, असं सांगतानाच येत्या निवडणुकीत भास्कर जाधव हे शिवसेनेचे आमदार असतील, असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं. आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा तळकोकणातून रत्नागिरीमध्ये दाखल झाली आहे.
.
कोकणात प्रकल्प हवेत पण ते प्रदूषणकारी प्रकल्प नकोत, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. युतीबाबत दोन्ही पक्षाचे नेते ठाम असताना मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं सर्वच्या सर्व २८८ जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरूवात केली आहे. जागावाटपाबाबत भाजपशी सध्या बोलणी सुरू नसल्यानं २८८ जागा लढवण्यासाठी शिवसेनेनं चाचपणी सुरू केली असल्याचं कळतं आहे. मातोश्रीवर रविवारी दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या.
दरम्यान, या मुलाखती सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नीरज गुंडे मातोश्रीवर पोहोचले. नीरज गुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही मित्र आहेत. गुंडे हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मातोश्रीवर पोहोचल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबत विचारणा केली असता, चहा पिण्यासाठी मातोश्रीवर आलोय, असं उत्तर नीरज गुंडे यांनी दिलं.