चलो अयोध्या! 'घर में बैठा है नकली, अयोध्या जा रहा है असली' ठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना

'अयोध्येला जाण्याची घोषणा अनेक जण करतात शिवसेना घोषणा करत प्रत्यक्ष कृती करते' 

Updated: Jun 13, 2022, 09:15 PM IST
चलो अयोध्या! 'घर में बैठा है नकली, अयोध्या जा रहा है असली' ठाण्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना

Aditya Thackeray Ayodhya Tour : हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray 15 जून रोजी आयोध्येला (Ayodhya) जाणार आहेत. यासाठी आज ठाणे रेल्वे स्थानकातून हजारो शिवसैनिक (ShivSainik) अयोध्येला रवाना झाले. 

यावेळी ठाणे स्टेशन (Thane Station) परिसरात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'जय श्री राम,शिवसेना जिंदाबाद' च्या घोषणांनी ठाणे रेल्वेस्थानक परिसर दणाणून गेला होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी आयोध्या दौर्‍यासाठी संधी मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता. यावेळी खासदार राजन विचारे तसंच युवासेना सचिव वरूण सरदेसाई हे देखील ठाणे रेल्वे स्थानकात उपस्थित होते

अयोध्या आणि प्रभू रामचंद्र हा शिवसेनेसाठी राजकीय मुद्दा नसून तो श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असल्याचे मनोगत यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मांडले. अयोध्येला जाण्याची घोषणा अनेक जण करतात, मात्र शिवसेना घोषणा करत प्रत्यक्ष कृती करते असा टोला एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने धर्मवीर आनंद दिघे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे माजी सभागृहनेते अशोक वैती यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकावरुन ही स्पेशल रेल्वे रवाना झाली. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.

त्याआधी 5 जूनला शिवसेना खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई अयोध्या दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अयोध्येतील स्थितीचा आढावा घेतला होता. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x