मुंबई: बॉलिवूडचा स्टार आणि ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफचा दिलदारपणा सर्वांना पाहायला मिळाला. आतापर्यंत आपल्या अभिनयानं घराघरा पोहोचलेल्या जग्गू दादानं आपल्या कृतीतून चाहत्यांची मन जिंकली. मावळवासियांना त्यांचं हे आगळं वेगळं रुप पाहायला मिळालं. त्यांचा हा दिलदारपणा पाहून अनेकांच्या डोळ्याचा कड्या ओलावल्या.
मिळालेल्या माहितीनुसार जॅकी श्रॉफ यांच्या घरी घरकाम करणाऱ्या तरुणीची आजी गेल्याचं कळताच त्यानं थेट आपल्या टीमसह मावळ गाठलं. या तरुणीच्या घरी तिच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला जग्गूदादा पोहोचले. पुण्यातील मावळ इथल्या पवनानगर परिसरात असलेल्या तरुणीच्या घरी आपल्या टीमसह पोहोचले.
जॅकी श्रॉफ यांनी तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना यावेळी धीर दिला आणि सांत्वन केलं. त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मावळमध्ये राहणारी दिपाली तुपे यांची आजी तानाबाई ठाकरे यांचे दोन दिवसांपूर्वी वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं. दीपाली बर्याच वर्षांपासून जॅकी यांच्या मुंबई घरी काम करत होती. आजीच्या निधनाची बातमी कळताच दिपाली तातडीनं मुंबईहून खासगी टॅक्सीनं पुण्यात घरी पोहोचली.
जॅकी देखील शुक्रवारी संध्याकाळी दिपालीच्या घरी पोहोचले. त्यांनी संपूर्ण कुटुंबाला धीर दिला. जवळपास ते आपल्या टीमसोबत तासभर दिपालीच्या घरी थांबल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी जॅकी दिपालीच्या नातेवाईकांसोबत जमिनीवर बसले होते. त्यांच्या या साधेपणाचं दिलदार स्वभावामुळे सर्वजण भावुक झाले.
जॅकी श्रॉफ यांना पाहून काहीकाळ कुटुंबीय आणि आजूबाजूचे लोक भारावून गेले आणि दु:खातून सावरले. त्यांचा हा साधेपणा आणि हे रुप सर्वांनाच भावणारं होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.