नांदेड : लाच मागितल्या प्रकरणी एसीबीनं एका आयपीएस अधिका-याविरोधात कारवाई केल्याने एकच खळबळ उडालीये. नांदेडचे सहाय्यक पोलीस अधिक्षक विजय कृष्ण यादव यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
२०१५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले विजय कृष्ण यादव हे अमरावतीमध्ये असतांना तिवसा पोलीस ठाण्याचे प्रभारी होते. त्यावेळी एका बिल्डींग मटेरीयलचा व्यवसाय करणा-याचा एक ट्रक तिवसा पोलीसांनी पकडला होता. या प्रकरणात विजयकृष्ण यादव यांनी दोन लाखाची रक्कम मागितल्याचा आरोप आहे.
तक्रार दात्याने या प्रकरणी अमरावती एसीबीकडे तक्रार केली. खात्री पटल्यावर अमरावतीच्या ए सी बी पथकाने सापळा रचला. दरम्यान च्या काळात यादव यांची बदली अमरावतीहून नांदेडच्या ईतवारा विभागात झाली.
विजय यादव यांनी तक्रारदारास नांदेडला लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथील हॉटेल न्यू पंजाब येथे सन्नीसिंघ बुंगई यास विजय यादव यांच्यासाठी १ लाख रुपये स्वीकारतांना अमरावती एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं.