'अभिनंदनची सुटका मोदींमुळे नव्हे तर आंतरराष्ट्रीय दबावामुळे'

यूपीए सरकारच्या काळात सीमारेषेवर एखादी चकमक झाली तरी मनमोहन सिंग यांच्यावर टीका व्हायची.

Updated: Apr 24, 2019, 07:49 PM IST
'अभिनंदनची सुटका मोदींमुळे नव्हे तर आंतरराष्ट्रीय दबावामुळे' title=

अहमदनगर: पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका नरेंद्र मोदी यांच्यामुळे नव्हे तर आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे केली, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते बुधवारी कोपरगाव येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी शरद पवार यांनी म्हटले की, यूपीए सरकारच्या काळात सीमारेषेवर एखादी चकमक झाली तरी नरेंद्र मोदी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित करायचे. मात्र, आता हीच जबाबदारी तुमच्यावर आल्यानंतर तुम्ही काय केले? त्यावेळी तुम्ही मनमोहन सिंग यांना देशात आरडीएक्स आलेच कसे?, असा सवाल विचारत. मग पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आरडीएक्सच्या स्फोटामुळे ४० जवान शहीद झाले. यावर तुमच्याकडे उत्तर आहे का?, असा सवाल पवारांनी विचारला. 

तसेच भारतीय वायूदलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका जीनिव्हा करारातंर्गत झाली. यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने आणलेला दबाव निर्णायक ठरला. मात्र, नरेंद्र मोदी याचे श्रेय स्वत:कडे घेतात. लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही मी संसदेतच असेन. तेव्हा कुलभूषण जाधवची सुटका का झाली नाही, हा सवाल मी जरूर विचारेन, असेही पवारांनी सांगितले. 

जनतेने गेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना संधी दिली होती. मात्र, आता मोदींच्या प्रभावाला उतरती कळा लागली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ निवडणुकांच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आल्याचेही पवारांनी सांगितले.