ऑनलाईन शॉपिंग महागात पडली; 548 रुपयांच्या पँट नादात खात्यातून 'असे' उडाले 99 हजार

ऑनलाईन शॉपिंग या तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाईन खरेदीच्या बहाण्याने तरुणाला तब्बल 99 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 

Updated: Jul 18, 2023, 04:51 PM IST
ऑनलाईन शॉपिंग महागात पडली; 548 रुपयांच्या पँट नादात खात्यातून 'असे' उडाले 99 हजार  title=

Wardha Crime News :  सध्या अनेकजण ऑनलाईन शॉपींग करतात. मात्र, ऑनलाईन शॉपिंग करत असताना योग्य ती खबरदारी न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. वर्धा येथील एका तरुणाला ऑनलाईन शॉपिंगच्या बहाण्याने गंडा घालण्यात आला आहे.  548 रुपयांच्या पँटच्या नादात त्याच्या खात्यातून तब्बल 99 हजार रुपये उडाले आहेत. या प्रकरणी सायबर पोलिस अधित तपास करत आहेत. 

राजकुमार विनोद बाभुळकर असे या फसवणुकीला बळी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. राजकुमार हा समुद्रपूर तालुक्यातील दहेगाव उजवणे गावात राहतो. त्याला ऑनलाइन पॅन्ट खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. 548 रुपयांची पँट राजकुमार याला 99 हजारला पडली आहे. 

राजकुमार याने ऑनलाईन पॅंट मागवली होती. मात्र, ही पँट त्याला साईजमध्ये होत नसल्याने परत करण्यासाठी राजकुमार याने ऑनलाइन खरेदी ऐपच्या कस्टमर केअर शी संपर्क साधला आणि तो  ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या तावडीत नकळत सापडला. या युवकाने आपला फोन पे चा पिन देखील त्या भामट्याला टाकला. राजकुमारच्या खात्यातून 99 हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने सायबर भामट्याने वळती केली.

राजकुमारला खरेदी केलेली पँट तर परत मिळाली नाहीच याउलट पँट खरेदीच्या नादात त्याची 99 हजार रुपयांची फसणुक झाली. या फसवणूक प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील  महिलेला सायबर गुन्हेगारांनी 91 लाखांनी गंडा घातला

पुण्यातील एका महिलेला सायबर गुन्हेगारांनी चक्क 91 लाखांनी गंडा घातलाय. या सायबर गुन्हेगारांची शक्कल पाहून पोलीसही चक्रावून गेले. फसवणूक झालेल्या महिलेला भामट्यांनी फोन करुन मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याची बतावणी केली. दुबईहून आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचं तिला सांगीतलं आणि तिला अंधेरीतील पोलिस अधिका-याशी संपर्क साधण्यास भाग पाडलं. पीडित महिलेनं त्या अधिका-याशी संपर्क साधला असता त्याने महिलेला बँक खातं सील करणार असल्याची माहिती दिली. शिवाय तीन वेगळे अकाउंट नंबर्सही देत खात्यावरील पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगीतले. चौकशी पूर्ण झाल्यावर पैसे परत देण्याचीही हमी दिली. पीडित महिलेनं पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित महिलेनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवरुन माहिती देऊ नका असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.