सदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड हल्ला; आरोपीची आत्महत्या

अनैतिक संबंधातून घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: Apr 17, 2019, 02:08 PM IST
सदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड हल्ला; आरोपीची आत्महत्या title=

पुणे : तरुणावर अॅसिड हल्ला आणि पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास सदाशिव पेठेत हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत अॅसिड हल्ला झालेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर हल्लेखोर तरुणाचा मृत्यू झाला. रोहित थोरात असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर सिद्धराम कलशेट्टी असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. अनैतिक संबंधातून हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी कलशेट्टीच्या आईशी रोहित थोरातचे अनैतिक संबंध होते. त्यातून तो तिला ब्लॅकमेल करत होता. तिने रोहित थोरातविरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल केला होता. याच प्रकरणातून रोहित थोरातवर हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हल्लेखोर सिद्धराम हा अक्कलकोटचा असून तो हल्ला करण्यासाठीच पुण्यात आला होता. रोहित थोरात हा सदाशिव पेठेत रहात असलेल्या इमारतीच्या खाली मैत्रिणीसोबत उभा होता त्यावेळी सिद्धरामने रोहितवर अॅसिड हल्ला तसेच गोळीबारही केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला केल्यानंतर सिद्धराम शेजारील इमारतीमध्ये लपला. जेव्हा पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी आले तेव्हा त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यांनंतर त्याने स्वत:ला गोळी मारुन घेतली. या गडबडीत तो इमारतीच्या डक्टमध्ये पडला त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.