११ वीच्या पाठ्यपुस्तकात प्रत्येक पानांवर चुकांचीच भर

 ११ वीच्या जीवशास्त्र पुस्तकात चुकाच चुका दिसून येत आहे.  

Updated: Dec 27, 2019, 06:40 PM IST
११ वीच्या पाठ्यपुस्तकात प्रत्येक पानांवर चुकांचीच भर title=
संग्रहित छाया

अरुण मेहेत्रे / पुणे : ११ वीच्या जीवशास्त्र पुस्तकात चुकाच चुका दिसून येत आहे. गरवारे इन्स्टिट्यूटच्या जीवशास्त्र विभागाच्या निवृत्त प्राध्यापिकेने ज्या काही चुका आहेत, त्याच्या दुरुस्त्या दाखवून दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकात आपली चूक झाल्याचे मान्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने केले आहे. दरम्यान, एखाद्या पाठ्यपुस्तकात जर असंख्य चुका असतील तर शिक्षकांनी शिकवायचे तरी कसे आणि विद्यार्थ्यांनी शिकायचे तरी काय ? पुण्यातील जीवशास्त्राच्या प्राध्यापिका हेमलता साने यांनी अकरावीच्या जीवशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील हा सावळा गोंधळ समोर आणला आहे.

विज्ञान शाखेच्या ११वी अभ्यासक्रमाचा भाग असलेले जीवशास्त्राचं पुस्तक चुकांनी भरलेले आहे. या पुस्तकातील निम्मा अभ्यासक्रम एव्हाना शिकवूनही झाला. असे असताना पुस्तकातील चुकांच्या दुरुस्तीची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. या पुस्तकात अक्षरशः प्रत्येक पानावर चुका आहेत. पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या प्राध्यापिका हेमलाता साने यांनी या चुकांसंबंधीचा अहवाल बालभारतीला सादर केला. त्यांनी या पुस्तकात एकूण ७८ दुरुस्त्या सुचवल्या आहेत.

प्राध्यापक हेमलता साने यांनी सुचवलेल्या बहुतांश दुरुस्त्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने स्विकारल्या आहेत. त्यासंदर्भातील शुद्धीपत्रक बालभारतीच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने जारी केलेले शुद्धिपत्रकही अशुद्ध असल्याचा हेमलता साने यांचा दावा आहे. त्यावर पुनश्च एकदा विचार विनिमय तसेच अभ्यास करून पुस्तकामध्ये आवश्यक ते बदल करणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. मात्र विषय तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून तयार होत असेलल्या पुस्तकात इतके दोष का, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेचीच सखोल समीक्षा होण्याची गरज व्यक्त होत आहे.