शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टर्निंग पाईंट? पवारांची कारकिर्द घडवणा-या 8 महत्वाच्या घटना

राज्यसभा निवडणुकीआधी नव्या पक्ष नोंदणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक आयोगापर्यंत उद्यापर्यंतची मुदत दिलीय.. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अर्ज करावा, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात स्पष्ट केल आहे. 

Updated: Feb 6, 2024, 11:03 PM IST
शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टर्निंग पाईंट? पवारांची कारकिर्द घडवणा-या 8 महत्वाच्या घटना  title=

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठा टर्निंग पाईंट ठरणार आहे. शरद पवारांची कारकिर्द घडवणा-या महत्वाच्या घटना जाणून घेऊया.  
शरद पवारांनी वयाची 83 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यापैकी 63 वर्ष पवार सक्रिय राजकारणात आहेत. 1 मे 1960 या दिवसापासून शरद पवार कुठल्या ना कुठल्या राजकीय पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ आयुष्यात 8 मैलाचे दगड आहेत ज्याशिवाय पवारांची कारकिर्द पूर्ण होऊ शकत नाही.

1 पुलोद सरकार, पहिल्यांदा मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या सरकारमधून शरद पवार 40 आमदारांसह बाहेर पडले. पुलोद अर्थात पुरोगामी लोकशाही दलचं सरकार स्थापन झालं, पवार वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. 

2 काँग्रेसमध्ये घरवापसी, दुस-यांदा मुख्यमंत्री

1986 मध्ये पवारांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आणि 1988 साली शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले

3 केंद्रात संरक्षणमंत्री आणि मुंबई दंगलींनंतर पुन्हा महाराष्ट्रात परत

90 च्या दशकाच्या सुरुवातीला नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात पवार संरक्षणमंत्री झाले. 1992 मुंबई दंगलीनंतर परिस्थिती सावरण्यासाठी त्यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं. 1993 मध्ये पवारांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

4 मराठवाडा विद्यापीठाचा 'नामविस्तार'

औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न पेटला आणि जातीय दंगली झाल्या. त्या रोखण्यासाठी 1994 मध्ये पवारांनी नामांतराऐवजी नामविस्ताराची कल्पना मांडली. आणि 'डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा नामविस्तार झाला. 

5 राष्ट्रवादीची स्थापना

1999 मध्ये सोनिया गांधींच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरुन पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांचं हे काँग्रेसमधलं दुसरं बंड होतं 

6 हरलेली एकमेव निवडणूक

2004 मध्ये बीसीसीआयच्या निवडणुकीत जगमोहन दालमियांचे निकटवर्तीय रणबीरसिंह महेंद्र यांनी अटीतटीच्या लढतीत पवारांचा पराभव केला. पवारांच्या कारकिर्दीतला हा एकमेव पराभव आहे.  

7 2008 ची शेतकरी कर्जमाफी

शरद पवार यूपीए सरकारमध्ये सलग 10 वर्षं कृषिमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2008 मध्ये केंद्र सरकारनं केलेली ऐतिहासिक कर्जमाफी. देशभरातल्या शेतक-यांची 72 हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली.

8  महाविकास आघाडी

2019 मध्ये काँग्रेस आणि शिवसेना या दोन परस्परविरोधी पक्षांना सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना पवारांच्या पुढाकारानं झाली.  

पवार सत्तेत असोत वा नसोत.. राज्याच्या राजकारणात पवार फॅक्टरशिवाय पान हलत नाही. 1 मे 1960 पासून पवारांची रजकीय कारकिर्द सुरु झाली आणि त्याचदिवशी महाराष्ट्राचीही स्थापना झाली. एवढा प्रदीर्घ प्रवास असल्यामुळे पवारांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला असला तरी राज्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर पवारांचा प्रभाव कायम राहणार हे नक्की.