कंबरभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडमधील धक्कादायक प्रकार

रायगडच्या आदिवासी वाडयांवरचं भयाण वास्तव समोर आले आहे.  कंबरभर पाण्यातून मृत महिलेची काढली अंत्ययात्रा.   

वनिता कांबळे | Updated: Aug 2, 2024, 07:13 PM IST
कंबरभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडमधील धक्कादायक प्रकार title=

Raigad Rain :  रायगडमध्ये आदिवासी बांधव कसं जीवन जगतात याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खालापूर तालुक्यातील आरकस वाडी, पिरकट वाडी, उंबरणेवाडी या आदिवासी ठाकूर वस्तीवर जायला साधा रस्ता नाही. दोन दिवसांपूर्वी पिरकट वाडीत एका महिलेचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह ग्रामस्थांना कंबरभर पाण्यातून नेण्याची वेळ आली. 

कंबरभर पाण्यातून काढण्यात आलेल्या या अंत्ययात्रेचा व्हिडिओ आता समोर आलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.  अनेक वाडया आजही मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचं भयाण वास्तव आपल्याला या दृश्यामधून समोर येतंय. याकडे नेत्यांचं लक्ष कधी जाणार हाच प्रश्न आहे. 

माणगाव ते पुण्याकडे  जाणारा मार्ग बंद

ताम्हिणी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. माणगाव ते पुण्याकडे  जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.  मागील आठवड्यात या मार्गावर दरड कोसळली होती यात एका व्यक्तीचा मृत्यु झाला होता तर एक व्यक्ती जखमी झाला होता. आदर वाडी , डोंगर वाडी इथं रस्ता खचला असून रस्त्याला तडे गेले आहेत.  दुर्घटना टाळण्यासाठी हा रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.  आज दुपारी 12 वाजल्या पासून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.  ताम्हिणी घाटात पर्यटकांची गर्दी होत असते त्यामुळे या मार्गावर वाहने मोठ्या संख्येने असतात. ही बाब लक्षात घेवून रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तसे आदेश जारी केले आहेत.

विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास 

नांदेडच्या लोहामधील गांधीनगर गावाची दयनीय अवस्था झालीय. या गावातून बाहेर पडण्यासाठी नाल्यावर पुल आणि रस्ता नसल्याने, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागतोय. यामुळे येथे रस्ता बनविण्याची मागणी येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केलीय.