आग लागली अन् गायीने हंबरडा फोडला, अन्यथा झोपेत गाव बेचिराख झालं असतं!

 गायीच्या हंबरण्याने मोठी दुर्घटना टळली आहे.  

Updated: Jun 20, 2019, 01:00 PM IST
आग लागली अन् गायीने हंबरडा फोडला, अन्यथा झोपेत गाव बेचिराख झालं असतं! title=

पुणे : भोर तालुक्यात गायीच्या हंबरण्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आपटी गावात मंगळवारी रात्री काही घरांना अचानक आग लागली. घरात रचून ठेवलेल्या गवत आणि चाऱ्याला आग लागली होती. घरे लाकडाची असल्याने क्षणार्धात या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्यानंतर गोठ्यात बांधण्यात आलेल्या गायीने हंबरडा फोडला आणि कुटुंब जागे झाले. त्यानंतर घराबाहेर आल्यावर आग लागल्याचे लक्षात आले. अन्यथा झोपेत सगळेच उद्धवस्थ झाले असते.

मध्य रात्रीनंतर वैरणीला आग लागली. त्यावेळी मात्र गौरी नावाच्या गायीने हंबरडा देऊन घरातील लोकांना जागे केले. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. दोन अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. घराला आग लागली होती. गौरीने हंबरडा फोडला नसता तर चित्र वेगळे असते. त्यामुळे एका गायने पाच कुटुंबाचाच नाही तर अनेक गावकऱ्यांचे प्राण वाचवलेत. 

देवाच्या रुपाने गाय संकटमोचक होऊन आली. अन्यथा आमच्या पाच कुटुंबांचे काय झाले असते, ते सांगणेच कठिण झाले असते, अशा भावूक प्रतिक्रीया काही ग्रामस्थांनी दिल्यात. दरम्यान, या गायीचे प्राण वाचवण्यासाठी गेलेली एक महिला आगीत जखमी झाली.