कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातल्या गिजवणे गावातल्या ७५ वर्षीय आज्जी (75 year old Grandmother) ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात (Gram Panchayat election candidate) उतरल्या आहेत. हौशाबाई दुंडाप्पा कांबळे (Houshabai Dundappa Kamble) असं या ७५ वर्षीय उमेदवार आज्जींचे नाव आहे. हौशाबाईंचा गावात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळेच त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी आपण सर्वात तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेलं आपण पाहिले आहे. पण आता राज्यात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ७५ वर्षीय आजी निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्या आजीचे नाव हौशाबाई दुंडाप्पा कांबळे असून ही आजी आहे कोल्हापूर जिल्ह्यातीलगिजवणे गावची.
राज्यात जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या इर्षेन उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील हीच इर्षा पाहायला मिळाली. एकीकडे प्रत्येक उमेदवार मोठा गाजावाजा करत अर्ज दाखल करण्यासाठी येत होते, त्याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील श्रेष्टी विद्यालयावर अर्ज करण्यासाठी गीजवणे गावच्या आजी हौशाबाई कांबळे पोहोचल्या.
गिजवणे गावातील हौशाबाई कांबळे या देवदाशी असून गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना नातवंडेही आहेत. स्वत: यल्लामा देवीची भक्त आणि देवदाशी असल्याने त्या गावात जोगवा मागतात. या निमित्ताने त्याचा गावात चांगला जनसंपर्क आहे. त्याचाच विचार करून त्यानी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मुलाने निवडणूक लढविण्यासाठी सहमती दर्शविल्यानंतर त्या थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबगीने पोहोचल्या. यावेळी त्यांनी लोकांची काम करायला निवडून यायचे असल्याची इच्छा बोलावून दाखवली. हौशाबाई कांबळे यांनी आपणच विजयी होण्याचा विश्वासही व्यक्त केलाय. त्यांचा या वयातला उत्साह, सक्रियता आणि ऊर्जा तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.