महाराष्ट्रावर 7.80 लाख कोटींचं कर्ज; लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप?

Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अर्थ खात्याचा विरोध असतानाही राज्य सरकारनं ही योजना मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... नेमका काय होता अर्थ खात्याचा आक्षेप? 

वनिता कांबळे | Updated: Jul 26, 2024, 08:24 PM IST
 महाराष्ट्रावर 7.80 लाख कोटींचं कर्ज; लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप? title=

Mazi Ladki Bahin Yojana : राज्यातील महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केलीय.. त्यानुसार राज्यातील दीड कोटी लाडक्या बहिणींना येत्या 19 ऑगस्टला प्रत्येकी 3 हजार रुपयांचं रक्षाबंधन गिफ्ट दिलं जाणार असल्याचं समजतंय... लाडक्या बहिणींसाठीच्या या योजनेमुळं महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणाराय. राज्याची गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेता या योजनेला अर्थ खात्यानं आधीच विरोध केला होता.

अर्थ विभागाचे आक्षेप कोणते?

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे 46 हजार कोटी रुपये कुठून आणणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.  या संदर्भातील तरतूद कशी करायची? राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही.  राज्यावर 7.80 लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना आणणं कितपत योग्य आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे.  मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी 4,677 कोटी रुपये मंजूर कसे केले? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.  असे अनेक आक्षेप अर्थ खात्यानं घेतले होते. मात्र हा विरोध डावलून मंत्रिमंडळानं योजनेला मंजुरी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून राजकारण

लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून आता राजकारण सुरू झालं. तिजोरीत पैसे नसताना मोठमोठ्या योजनांची घोषणा कशासाठी? निवडणुका संपल्यावर योजना बंद होईल असा दावा संजय राऊतांनी केला...तर राऊतांच्या वक्तव्याची दखल भगिनींनी घ्यावी असं आवाहन नितेश राणेंनी केलं. तर दुसरीकडं अर्थ खात्याला चिंता करण्याची काहीच कारण नाही, असं मत सत्ताधा-यांकडून व्यक्त केलं जातंय. सगळी सोंगं करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, असं म्हणतात... मात्र कितीही कर्जबाजारी असला तरी भाऊ आपल्या लाडक्या बहिणीसाठी खर्च करताना मागंपुढं थोडंच पाहणाराय?

रक्षाबंधनाला राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणार गिफ्ट 

रक्षाबंधनाला राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे.. रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन एकत्रितरित्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.. तशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय.  महिलांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज दाखल करावेत असं आवाहनही अजित पवारांनी केलंय.. तसंच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय...