कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले असून ते आता गायकवाड पुतळ्यापर्यंत पोहचलं आहे. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथल्या कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यान दत्त मंदिराजवळ पाणी पोहोचलं आहे.
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 136.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर पंचगंगा नदी लवकरच इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 907.74 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा कोल्हापूर रोडवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. आतापर्यंत 30हून अधिक गावांचा अंशता संपर्क तुटला आहे. मौजे वेतवडे तालुका पन्हाळा इथली पाच कुटुंबांचं सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करण्यात आलंय. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश दिला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितलं आहे.