चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण १९ लाख ४ हजार ३२ मतदार २१९३ मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यासाठी सुमारे २० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व मतदान केद्रांवर EVM च्या संदर्भात विशेष काळजी घेतली जात आहे. ३ टप्प्यात या यंत्रांची तपासणी करण्यात आली असून काही राखीव यंत्रे प्रशासनाच्या दिमतीला असणार आहेत. मतदान केद्रांवर येजा करण्यासाठी पुरेशा वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ५२ संवेदनशील केंद्रे असून यासाठी सूक्ष्म निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर पुरेशा सावलीत मतदान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४ हजार पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यात स्थानिक पोलीस, CRPF यांचा समावेश आहे.
पुढचे २ दिवस स्थानिक व विभागीय गस्त वाढविण्यात आली असून मतदारांमध्ये विश्वास वाढावा यासाठी विविध शहरात पोलीस पथसंचलन करण्यात आले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.