राज्यात वर्षभरात ५ हजार बाईकस्वारांचा बळी

बाईक चालवतांना काळजी घेण्याची गरज

Updated: Dec 24, 2019, 06:35 PM IST
राज्यात वर्षभरात ५ हजार बाईकस्वारांचा बळी title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : बाईकवरचा प्रवास धोकादायक झाला आहे. बाईकस्वारांचा सर्वाधिक अपघात होत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात बाईकची संख्या लाखोंच्या घरात आहे. बाईक किंवा दुचाकी नाही असं घर शोधावं लागतं. पुणे नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरात घरटी एक तरी बाईक किंवा स्कुटी आहेच आहे. पुणे शहराची ओळख तर बाईकवाल्यांचं शहर अशी झाली आहे. बाईक वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असलं तरी बाईकमुळे होणाऱ्या अपघातांचीही संख्या वाढली आहे. 

२०१८ मध्ये झालेल्या अपघातांचं विश्लेषण केलं असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये राज्यात ३५ हजार ७१७ रस्ते अपघात झाले. यातले १३ हजार २६१ अपघात बाईकचे होते. या अपघातात तब्बल ५ हजार १४३ जणांचा मृत्यू झाला. तर ७ हजार २७८ जण जखमी झाले. बाईकस्वारांच्या अपघाती मृत्यूची तुलना केल्यास गेल्या पाच वर्षात देशात विमान अपघातात एवढे बळी गेलेले नाहीत.

बाईकही सगळ्यात वेगवान आणि प्रवासाचं सोपं साधन आहे. बाईक चालवताना सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही हे बळींची आकडेवारी वाढण्याचं मुख्य कारण आहे. बाईक चालवताना हेल्मेटचा वापर करावा. दारु पिऊन बाईक चालवू नये. बाईकचा वेग ताशी ४५ ते ६० किलोमीटर एवढाच ठेवावा. बाईकवर दोन पेक्षाजास्त लोकांनी प्रवास करु नये.

भारतात तर आता स्पोर्ट्स बाईकचा चाहतावर्ग वाढला आहे. लाखो रुपयांच्या बाईक घेण्याची मानसिकता भारतीयांमध्ये तयार झाली आहे. पण ती बाईक चालवताना पाचशे हजार रुपयांचा हेल्मेट घालण्याची मानसिकता नाही. बाईक चालवताना सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल तेव्हाच बाईकस्वाराचे अपघाती मृत्यू थांबतील.