कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी असताना कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
कल्याणच्या जोशीबाग परिसरातील या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. 4 मजली इमारतीमध्ये 33 जणांचं कुटुंब राहतं. गणपती दरम्यान संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. एका मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून पुढे 33 पैकी 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ४ सप्टेंबर २०२० रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthbulletine pic.twitter.com/4JIpxcGUWz
— Kalyan Dombivli Municipal Corporation (@KDMCOfficial) September 4, 2020
कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचा कहर वाढताच आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आतापर्यंत एकूण 33 हजार 839 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 672 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 8 लाख 63 हजार 62 इतका झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण 6 लाख 25 हजार 773 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 2 लाख 10 हजार 978 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण होण्याचं प्रमाण आता 72.51 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आजपर्यंत 25 हजार 964 जणांचा बळी गेला आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 3.01 टक्के इतका आहे.